टेंभुर्णी : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने भीमा खोऱ्यातील धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे.
उजनी धरण पूर्ण भरले असल्याने धरणातून रात्री ८.३० वाजल्यापासून ७६ हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे.
तर वीर धरणातून नीरा नदीत ७ वाजल्यापासून ४७ हजार ३५० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणातून मिळून संगमातून पंढरपूरच्या चंद्रभागेत १ लाख क्युसेकचा विसर्ग राहणार आहे.
उजनी धरणातून दुपारी १२ वाजता ५ हजार व दुपारी २ वाजता १० हजार क्युसेक करण्यात आला आहे. सायंकाळी त्यात पुन्हा वाढ करण्यात आली.
गेल्या तीन दिवसांपासून भीमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी होत आहे. भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामुळे खडाकवासला, पवना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
रात्री ७५ हजार क्युसेक आणि वीजनिर्मितीतून १ हजार ६०० असा एकूण ७६ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. दोन्ही धरणातील एकत्रित सव्वा लाख क्युसेक विसर्ग भीमा नदीत राहणार आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवाकानुसार विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्रातील सखल भागातील नागरी वस्तीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.
गावांना सतर्कतेचा इशाराभीमा व नीरा नदीपात्रातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या शेतीला पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना नदीकाठच्या भागात जाण्याचे टाळण्यासाठी आणि पूरस्थितीबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नीरा नदीला पूरनीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढला आहे. भाटघर धरणात १०० टक्के, नीरा देवधर धरणात साठा ९८.९८ टक्के, वीर धरणात ९०.७४ टक्के पाणीसाठा आहे. नीरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीला पूर आला आहे.
टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविलाउजनी आणि वीर दोन्ही धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविला आहे. उजनीतून सकाळी ५ हजार, १० हजार, २१ हजार त्यानंतर रात्री ११ वाजता ७५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरु झाला. शिवाय वीर धरणातूनही सुरुवातील ३३ हजार, त्यानंतर ४२ हजार आणि सायकांळी ७ वाजता ४७ हजार ३५० क्युसेकचा विसर्ग सुरु होता.
अधिक वाचा: Sugarcane FRP : राज्यातील साखर कारखान्यांकडे मागील गाळप हंगामाची किती एफआरपी बाकी?