यावर्षीच्या खरीप हंगामात जणू निसर्गानेही बळीराजावर वक्रदृष्टी टाकल्याची भावना निर्माण होत असून, दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीत आणखीच भर पडली आहे.
महागामोलाचे खते, बियाणे खरेदी करून जिवापाड जोपासलेली पिके पाण्याच्या हिसक्यासरशी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा जीव तोळा तोळा होत आहे. पंचनामे उरकून शासन मदतीचा हातभार लावेल, अशी भाबडी आशा शेतकरी बाळगून आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा आकडा ९१ हजार हेक्टरवर पोहोचला असून, तो अजून वाढण्याची शक्यता आहे.
१७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात २२ मंडळात अतिवृष्टी झाली. या संकटाने त्याच वेळी पिके भुईसपाट झाली होती. रानात उरलंसुरलं पीकही २८ आणि २९ ऑगस्ट रोजीच्या अतिवृष्टीने वाहून नेलं.
९१ हजार हेक्टर बाधित
आठवडाभरापूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. साधारणतः २६ ऑगस्टपर्यंत प्रशासनाने ६० टक्के पंचनामे केले होते. त्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीची भर पडली. सद्यस्थितीत ९१,१२६ हेक्टररील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे. नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पंचाम्यात अतिवृष्टीचे अडथळे
मागील वेळी झालेल्या अतिवृष्टीनंतर कृषी, महसूल विभागाने पिकांचे पंचनामे सुरू केले. मात्र, दोन दिवसांच्या या पावसाने त्यातही व्यत्यय आणला. आता पंचनाम्यांना गती द्यावी लागणार आहे. प्रशासनानेही त्या दृष्टीने निर्देश देण्याची गरज निर्माण झाली आहे.
९२ हजार शेतकऱ्यांना फटका
• अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र, आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यांतून पुढे आलेल्या माहितीनुसार, ९२५१० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
• यामध्ये हिंगोली तालुक्यातील ३२२००, कळमनुरी ३१३६०, सेनगाव १४८००, वसमत ७९०० आणि औंढा नागनाथ तालुक्यातील ६२५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील अतिवृष्टी आणि २८, २९ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने या नुकसानीत आणखी भर पडणार आहे.
जिल्ह्यात यापूर्वी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु आहेत. २८ व २९ ऑगस्ट रोजी पुन्हा अतिवृष्टी झाल्याने पंचनाम्यांमध्ये अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे आता सुटीच्या दिवशीही पंचनाम्याचे काम सुरु राहणार आहे. वेळेत पंचनामे पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन करेल. - अभिमन्यू बोधवड, निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली.
किती हेक्टर क्षेत्र बाधित ?
कळमनुरी - ३४३७८
हिंगोली - २७४००
सेनगाव - १४९३०
औंढा ना. -९२१८
वसमत - ५२००
एकूण - ९१,१२६
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र