कोल्हापूर : पावसाची सोमवारपासून काहीशी उघडीप जाणवत असली तरी सद्य मान्सून वारे सक्रिय झाल्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या (शनिवार) पासून गुरुवार (दि. १८) या आठवड्यात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
दक्षिण ओरिसा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीदरम्यान ३.१ किलोमीटर उंचीपर्यंतच्या चक्रीय वाऱ्याची स्थिती झाली आहे.
मान्सून आसाचे पश्चिम टोक दक्षिणेकडे गुजरातपर्यंत सरकल्यामुळे त्याच्या परिणामातून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेतून मान्सून वारे सक्रिय झाले आहे. शनिवार, दि. १३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
सातारा आणि सांगली जिल्ह्यात अजूनही पुढील सहा दिवस सोमवार, दि. १५ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूरची परिस्थिती◼️ पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी १४ फूट ५ इंच आहे. अजून दोन बंधारे पाण्याखाली आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.◼️ तळकोकण आणि धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीही स्थिर आहे.◼️ पाऊस कमी झाल्याने खरीप पिकांना खतांचा डोस देऊन आंतरमशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.◼️ शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांतील पावसाचे प्रमाण कमी असलेल्या खडकाळ जमिनीतील खरिपाची पिके आणि ऊसपिकास शेतकरी पाणी देताना दिसत आहेत.
अधिक वाचा: ग्रामीण शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्त्यांचे होणार डिजिटल अभिलेख; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?