देशभरातील शेतकरी, हवामानतज्ज्ञ आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी नैर्ऋत्य मान्सूनच्या आगमनाची प्रक्रिया यंदा लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दिलेल्या अंदाजानुसार, केरळमध्ये २६ मे रोजी नैर्ऋत्य मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
देशात साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश होतो. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे सरकत संपूर्ण देश व्यापतो.
जून ते सप्टेंबर या कालावधीत असणाऱ्या पावसाळी हंगामाची अधिकृत सुरुवात मान्सूनच्या केरळ प्रवेशापासून होते.
गेल्या वर्षी मान्सून लवकर दाखल
◼️ हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश २४ मे रोजी झाला होता.
◼️ यंदाही मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने कृषी क्षेत्रासह विविध घटकांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.
◼️ भारतीय हवामान विभागाने संभाव्य तारीख २६ मे सांगितली असली तरी मान्सूनचा प्रवेश चार दिवस आधी किंवा चार दिवस उशिराही होऊ शकतो.
केरळमध्ये मान्सूनचे कधी आगमन
| वर्ष | अंदाज | प्रत्यक्ष | फरक |
|---|---|---|---|
| २०२० | ५ जून | १ जून | ४ दिवस आधी |
| २०२१ | ३१ मे | ३ जून | ३ दिवस उशिरा |
| २०२२ | २७ मे | २९ मे | २ दिवस उशिरा |
| २०२३ | ४ जून | ८ जून | ४ दिवस उशिरा |
| २०२४ | ३१ मे | ३० मे | १ दिवस आधी |
| २०२५ | २७ मे | २४ मे | ३ दिवस आधी |
अधिक वाचा: अल-निनोचा 'ताप' कमी करणार IOD, याचा मान्सूनला कसा होणार फायदा; समजून घ्या सोप्या भाषेत
