Join us

मान्सून लवकरच सक्रीय : पुढील तीन-चार दिवसांत या जिल्ह्यांत अतिवृष्टीच्या इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 08:46 IST

Monsoon 2025 नैऋत्य मोसमी अर्थात मान्सून वेगाने प्रगती करत आहे. राज्यात रविवारी दाखल झालेल्या मान्सूनने केवळ २४ तासांत मुंबईपर्यंत धडक मारली आहे.

नैऋत्य मोसमी अर्थात मान्सून वेगाने प्रगती करत आहे. राज्यात रविवारी दाखल झालेल्या मान्सूनने केवळ २४ तासांत मुंबईपर्यंत धडक मारली आहे.

पुढील तीन ते पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.

दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर या भागात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवसांत अतीवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तविला आहे.

केरळ तसेच तळकोकणात वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने केवळ २४ तासांतच पुण्यासह मुंबईपर्यंत धडक मारली आहे. मान्सूनने सोमवारी मुंबई, पुणे तसेच सोलापूरपर्यंतचा भाग व्यापला आहे.

मराठवाडा आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये सध्या कोणताही बदल संभवत नसल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, गोव्यासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे कोकण, पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

'यलो अलर्ट' जारी अहिल्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवसांत तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यताही विभागाने वर्तविली आहे. तर विदर्भात पुढील पाच दिवसांत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

अधिक वाचा: Ujani Dam Water Level : भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजपाऊसहवामान अंदाजमहाराष्ट्रमराठवाडाविदर्भकोकणकेरळ