Lokmat Agro >हवामान > Marathawada weather update : मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Marathawada weather update : मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Marathawada weather update : Unseasonal rain with gale force in Marathwada | Marathawada weather update : मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Marathawada weather update : मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी बहुतांश भागात विजेच्या कडकटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे खरीपसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.(Marathawada weather update)

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी बहुतांश भागात विजेच्या कडकटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे खरीपसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.(Marathawada weather update)

शेअर :

Join us
Join usNext

Marathawada weather update :  फेंगल चक्रीवादळानंतर वातावरणात मोठा बदल झाला आहे. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी बहुतांश भागात विजेच्या कडकटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे खरीपसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगरसह बीड, गेवराई, हिंगोली, जालना, परभणी  जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. बहुतांश भागात शुक्रवारी पहाटे विजेच्या कडकटासह अवकाळी पाऊस झाला. पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बीड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बीड आणि गेवराई शहरासह तालुक्यातील विविध भागांत पाऊस झाला. आठ दिवसांपासून थंडी पडत होती. मात्र, बुधवार(४ डिसेंबर) पासून अचानक ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली. त्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गेवराई शहरात अर्धा ते पाऊण तास भुरभुर पाऊस झाला. पावसामुळे बाजारपेठेतील वर्दळ थंडावली.

बीड, पाली, आनंदवाडी, पेंडगाव, शिदोड, घाटसावळी या भागांत पावसाने हजेरी लावली. तर गेवराई तालुक्यातील तलवाडा, पांढरवाडी, गाँडगाव, कोल्हेर, किनगाव, मन्यारवाडी, गोविंदवाडी, बागपिपळगाव, बेलगाव, आगरनांदूरसह विविध भागांत चांगला पाऊस झाला. हा पाऊस ज्वारीला चांगला राहणार आहे. मात्र, हरभरा, राजमा व इतर रब्बी पिकांना फटका बसणार आहे.

जालना  जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे फळपिके, रब्बीतील हरभरा, ज्वारीसह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष, पेरू बागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून दुपारच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हलक्या प्रमाणात हजेरी लावली. ३ डिसेंबर रोजी वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे) येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे ज्वारी व रब्बी पिकांचे नुकसान झाले.

६ डिसेंबर रोजी काही भागात हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. शुक्रवारी दुपारपासूनच वातावरणात दमटपणा जाणवत होता. त्यानंतर दुपारी साडेचार ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व डिग्रस-कोंढूर परिसरात हलका पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात  शुक्रवारी बहुतांश भागात विजेच्या कडकटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे खरीपसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगरसह सिल्लोड, गंगापूर, पैठण, खुलताबाद, सोयगाव, फुलंब्री, कन्नड तालुक्यातील बहुतांश भागात शुक्रवारी पहाटे विजेच्या कडकटासह अवकाळी पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने खरीप हंगामातील ४० हजार हेक्टरवरील तूर पिकाला मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर हरभरा पिकाचीही वाढ खुंटली असल्याचे दिसून येत आहे. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ४० हजार हेक्टरवर तूर पिकाची पेरणी केली. हे पीक बहरात असताना मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या वातावरणाचा फटका या पिकाला बसत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

त्याचबरोबर रब्बी हंगामातील हरभरा पिकालाही मोठा फटका या वातावरणाचा बसला आहे. दरम्यान, जिल्ह्यात तूर, हरभरा व कांदा पिकाला या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका सध्या काढणीला आलेल्या तूर आणि हरभरा या पिकांना बसत असल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात आज घडीला ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड केलेली आहे. तुरीला सध्या शेंगा लगडल्या आहेत; परंतु ऐन शेंगा पक्वतेच्या कालावधीत वातावरण ढगाळ झाल्याने तुरीवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे.

याशिवाय सध्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी झालेली असून, त्यावर आभाळ आल्याने घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी करून पिके सुरक्षित करावीत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात सुमारे १ लाख ८२ हजार हेक्टरवरील हरभरा अन् ४३ हजार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आले आहे. पक्व होण्याच्या अवस्थेतील तुरीच्या शेंगा व हरभरा पिकाचे कोवळे शेंडे अळी कुरतडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

आभाळामुळे तुरीवर कीडरोगाची लागण होण्याची भीती आहे, तसेच हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी तूर पिकाची काळजी घ्यावी, जैविक आणि वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा फवारणीसाठी वापर करावा. -भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक, नांदेड

फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नाही. रब्बी पेरणी लांबल्याने ४ एकरावर हरभऱ्याची पेरणी केली. हे पीक सध्या फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. एकेका झाडावर १० ते १२ अळ्या आहेत. - सुरेश कावळे, शेतकरी

हवामानातील बदलामुळे तूर, हरभरा पिकांना फटका बसत आहे. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकऱ्यांना कृषी विभाग मार्गदर्शन करीत आहे. - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.

पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार

प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस पडेल, असा अंदाज 'वनामकृ' विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज (७ डिसेंबर) रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. किमान तापमानात पुढील ३ दिवस ४ ते ५ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर विरजण

• कापसाच्या पिकातून शेतकऱ्यांनी केलेला खर्च व मजुरी निघणे मुश्कील झाले आहे. वेचणीसाठी किलोला १० ते १२ रुपये खर्च येत आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पन्नातून अपेक्षित नफा मिळण्याची आशा दुरापास्त झाली आहे.

• खरीप हंगाम हातातून गेला तरी रब्बी हंगामातून उत्पन्न साधता येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून वर्तविली जात होती. मात्र, बिगरमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर विरजण पडले आहे.

पावसामुळे कापूस भिजला

• अनेक शेतातून वेचणीला आलेला कापूस या पावसामुळे भिजून गेल्याने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्याला कपाशीवरील लावलेला खर्च निघतो की नाही, याची चिंता आहे. त्यातच पुन्हा कापूस भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

• यावर्षी हलक्या जमिनीतील कापूस एका वेचणीतच पाचोळा झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेतात गहू पेरण्याची तयारी सुरू केली आहे. या पावसाचा फायदा गहू पेरणीसाठी होणार असल्याने यावर्षी परिसरात गव्हाचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Marathawada weather update : Unseasonal rain with gale force in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.