Join us

Maharashtra Weather राज्यात पावसाची प्रतीक्षाच; एक आठवड्यानंतर पडणार असा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:49 IST

सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस होत असला तरी आजची स्थिती पाहता महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही.

पुणे: राज्यात मान्सून रेंगाळलेला असून, मंगळवारपासून (दि. १८) मुंबईत पावसाचा अंदाज आहे. पण, उर्वरित राज्यात २३ जूनपासून वरुणराजा बरसण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी पावसाच्या सद्य:स्थितीवर सविस्तर सांगितले आहे.

महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही. गेल्या पाच दिवसांपासून मान्सूनच्या दोन्ही शाखा जागेवरच दिसत आहेत.

मान्सूनची प्रतीक्षा का? ■ दरवर्षी मान्सूनचे आगमन व वाटचालीत त्याच्या प्रवाहात दिसणारा जून महिन्यातील कमकु वतपणा यंदाही दिसून आला आहे. अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी बळकट मान्सूनी वारे वाहत आहे.■ या व्यतिरिक्त मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही. म्हणून महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा आहे.

मान्सूनच्या वाटचालीत विसंगती काय?■ दरवर्षी, मान्सून प्रवाह, त्याच्या वाटचालीत, केरळ ते कर्नाटक प्रवासानंतर, जून मध्यावर सहसा, कमकुवत होऊन कर्नाटकातच मुक्काम ठोकत असे. पण यावर्षी मात्र त्याने फक्त जागा बदलून, काहीसे पुढे वेऊन त्याने महाराष्ट्रात मुक्काम ठोकला आहे.■ दोन दिवसांच्या फरकाव्यतिरिक्त, मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे त्याच्या वाटचालीत बरोबर आहे.

महाराष्ट्रातील मान्सून कुठे?सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस होत असला तरी आजची स्थिती पाहता महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही. गेल्या पाच दिवसांपासून मान्सूनच्या दोन्हीही शाखा जागेवरच खिळलेल्या दिसत आहेत.

मुंबईत आजपासून पाऊसअरबी समुद्रीय पश्चिमी वारे व किनारपट्टीवरील ३१०० मीटर उंचीवरचा हवेतील दक्षिणोत्तर कमी दाबाचा आस यामुळे मंगळवारपासून (दि. १८ ते २५ जून) आठवडाभर, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उर्वरित महाराष्ट्रात स्थिती काय असेल?■ दरम्यान (१८ ते २२ जून) च्या पाच दिवसांत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा २९ जिल्ह्यांत मात्र केवळ तुरळक ठिकाणीच वर्तविलेल्या मध्यम पावसाची शक्यता ही कायम आहे.■ मंगळवार व बुधवारी १८, १९ जून रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गोंदिया, गडचिरोली दोन दिवस मात्र जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.

चांगला पाऊस कधी?■ सध्याचा कोकणातील सात जिल्ह्यांतील मान्सूनचा जोर पाहता, येत्या पाच दिवसांनंतर म्हणजे पौर्णिमेदरम्यान महाराष्ट्रासाठी नक्कीच पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनची बंगाल शाखाही पूर्व भारतात पुढे झेपावणार आहे.■ मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा सह्यादीवर चढाई करून, सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाछायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते, पौर्णिमेनंतर म्हणजे रविवार, दि. २३ जूनपासून मान्सूनची सक्रियता वाढून राज्यात पाऊस सुरू होईल.

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊसहवामानमोसमी पावसाचा अंदाजविदर्भमराठवाडाकोकणमुंबईशेतीशेतकरी