Maharashtra Weather Update : चक्रीवादळाच्या रुपाने पुन्हा एकदा एक मोठे संकट देशावर घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाचा (Cyclone Fengal Alert) सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे.
तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा विशेष असा काही परिणाम जाणवणार नसून, किनारी भागांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण -पश्चिम बंगालाच्या खाडीवर तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वारे उत्तर -पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांमध्ये तसेच कराईकल आणि महाबलीपूरमदरम्यान जाणवण्याची शक्यता आहे. याच काळात वाऱ्याचा वेग हा ताशी ७० किलोमीटर वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज (२९ नोव्हेंबर ) आणि ३० नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तामिळनाडूसह आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
फेंगल चक्रीवादळ हे गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेआठ वाजता त्रिंकोमाली पासून ११० किलोमीटर, नागपट्टिनम पासून ३१० किलोमीटर तर चेन्नईपासून ४८० किलोमीटर दूर होते. हे चक्रीवादळ श्रीलंकने किनारी प्रदेशाला धडकून भारतात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनार पट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
महाराष्ट्रातील हवामान
नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रोजी स्थिर होते. या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात पूर्व आणि आग्नेय दिशेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यातील थंडी काही दिवस कमी होण्याच्या शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पारा गुरुवारीही नऊ अंशांवर कायम आहे. हवामान कोरडे असल्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रोजी
अहिल्यानगर ९.५, पुण्यात ९.८, नाशिक १०.५, सातारा १२.५, सोलापुर १४.६, छत्रपती संभाजीनगर ११.६, धाराशिव १२.४, परभणी ११.५, नागपुर ११.८, गोंदिया ११.४, वर्धा १२.४ आणि अकोला १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* थंडीपासून बचाव करण्यासाठी पशुधनाच्या संरक्षणासाठी खिडकी व दरवाज्यांना गोण्याचे पडदे लावावेत. पशुधनाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या बसण्याच्या ठिकाणी काड/पेंढा/मॅट वापरून जमिनीतील थंडावा कमी करावा. दिवसा सूर्य प्रकाशात सहवास लाभणे अत्यंत गरजेचे आहे.
* सध्या किमान तापमानात झालेल्या घटमुळे केळी पिकावर याचा परिणाम होऊ नये म्हणून बागेस सकाळी मोकाट पध्दतीने पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.