Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. सध्या राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली असून किमान आणि कमाल तापमानात (Temperature) मोठी वाढ झाली आहे. आज (८ फेब्रुवारी) रोजी राज्यात मुख्यतः आकाश निरभ्र राहणार आहे.
विदर्भातील नागपुरात (Nagpur) मात्र काही प्रमाणात तापमानात घट झालीये. त्यामुळे उकाड्यापासून नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. तर मुंबईचा पारा ३५ अंश सेल्सिअसवर पारा गेला असून गेल्या काही वर्षांतील फेब्रुवारी महिन्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. येत्या २४ तासांत राज्यातील हवामान व तापमान फारचा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
पुण्यातील (Pune) कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
नागपूरमधील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. नागपूर मधील तापमानात काहीशी घट झाल्याने नागपूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. तर पुढील काही दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्रातीलनाशिकमधील (Nashik) कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. पुढील काही दिवसांत नाशिकच्या किमान तापमानात ४ ते ५ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत करता येते.
* तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.