कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. पावसाला सातत्य नसले तरी धरणक्षेत्रात जोर कायम आहे. पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे.
गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आज, शुक्रवारपासून चार दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस वाढला आहे.
पावसामध्ये सातत्य नसले तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रात सरासरी ६५ मिलिमीटर पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे.
राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३८१९, 'वारणा'तून ९७५७, तर 'दूधगंगा'तून ६४९६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे 'भोगावती', 'वारणा', 'दूधगंगा' नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदी ३१ फुटांपर्यंत पोहोचली आहे. पाणी वाढल्याने ३६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावरील तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून रविवारपर्यंत (दि. ६) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
अधिक वाचा: केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; आता प्रत्येक गावात सुरु होणार स्वयंचलित हवामान केंद्र