Join us

Maharashtra Weather Update : पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:33 IST

आजपासून राज्यात किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीने हुडहुडी भरू लागली आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशांवर आला असून, पुढील चार दिवसांमध्ये थंडीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्यामध्ये सोमवारी (दि. ९) सर्वात कमी किमान तापमानाची नोंद जळगावला ८.६ अंश सेल्सिअस झाली. सध्या राज्यामध्ये पावसाचे सावट दूर झाले असून, आकाश निरभ्र झाले आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यामध्ये गारठ्यामध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा १० अंशांखाली घसरला आहे, तर पुण्यातील पारा १२ अंशांवर आला आहे. माळीण ८.३, तळेगाव ९.१ तर एनडीए १०.३ अंशांवर नोंदवले गेले. सोमवारी (दि. ९) पहाटे पुण्यात चांगलीच थंडी जाणवली आणि आता दुपारीदेखील गारवा जाणवत आहे.

आजपासून राज्यात किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा सुरू झाली.

जळगावात ८ अंशांवर पाराराज्यातील किमान तापमानात चांगलीच घट झाली असून, सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ८.६ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर नगर १३.७, महाबळेश्वर १५.०, नाशिक ९.४, सातारा १६.५. मुंबई १९.२, छत्रपती संभाजीनगर १४.६, गोंदिया २०.०, नागपूर १६.० अंश सेल्सिअस तापमान होते.

कुठे किती किमान तापमानमुंबई : १३.७ठाणे : २०डहाणू : १६पुणे : १२जळगाव : ०८नाशिक : ०९अहिल्यानगर : १३.७छ. संभाजी नगर : १४.६जालना : १६महाबळेश्वर : १५मालेगाव : १६.६परभणी : १६.२सातारा : १६.५

पुणे शहरात किमान तापमानाचा पारा सोमवारी (दि.९) पहाटे ९ ते १४ डिग्री से. ग्रेडच्यादरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा २ ते ३ डिग्री से. ग्रेडने खालवला आहे. शिवाय अतिउंचीवरील वर दाखवलेल्या वाऱ्यांच्या झोताबरोबर जमीन पातळीवरही, समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीपर्यंत, पाकिस्तानकडून वायव्य दिशेने येऊन महाराष्ट्रात पश्चिमी दिशा घेणारे थंड कोरडे वाहत आहे. या दोघांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्रात खानदेश, नाशिककडून हळूहळू थंडी पडण्यास अपेक्षितपणे सुरुवात झाली आहे. पुढील १० दिवस म्हणजे बुधवार, दि. १८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ, पुणे

टॅग्स :हवामानतापमानमहाराष्ट्रभारतपुणेनाशिकजळगाव