आज (दि. २५) कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर चंद्रपूर आणि नागपूर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा भागांतील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून, या भागांनाही ऑरेंज अलर्ट सांगितलेला आहे. पुण्यातही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात मागील दोन आठवड्यांपासून पूर्वमोसमी पाऊस ठाण मांडून बसला आहे.
राज्यात पूर्वमोसमी पावसाचे थैमान
• कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मान्सून केरळसह कर्नाटक किनारपट्टी वर येऊन थडकला असला, तरी राज्यात पूर्वमोसमी पावसाने थैमान घातले आहे.
• नैऋत्य मान्सून राज्यात दाखल होईपर्यंत पूर्वमोसमी मान्सून कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या मशागतीची कामे पूर्ण करावीत.
• मात्र, हा पाऊस पूर्वमोसमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी याचा वापर फक्त मशागत आणि तयारीसाठीच करावा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रासाठी शुभसंकेत......
• मान्सून महाराष्ट्रात लवकरच दाखल होईल. दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या वाटचालीसाठी स्थिती अनुकूल असल्याचे मुंबई येथील विभागीय हवामानशास्त्र केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुटे यांनी सांगितले.
• मान्सून हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे त्या म्हणाल्या. सध्या मान्सूनबाबत व्यक्त करण्यात आलेला अंदाज हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रावरून मांडण्यात आला आहे.
इकडे पाऊस, तिकडे ऊन
• केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्हे आणि गोव्यात सात दिवस मुसळधारेचा अंदाज आहे.
• उत्तरेत पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये २६ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम असेल.
हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या