हबीब शेख
गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे सिद्धेश्वर धरणाचापाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या धरणात ८० टक्के उपयुक्त जलसाठा असून, येलदरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. (Siddheshwar Dam Water)
त्यामुळे कोणत्याही क्षणी सिद्धेश्वर धरणातून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. (Siddheshwar Dam Water)
धरण भरत आल्याने शेतकऱ्यांना आनंद
सध्या सिद्धेश्वर धरणात सुमारे ६५ दलघमी पाणी साठले असून, पूर्ण क्षमतेसाठी फक्त १६ दलघमी पाणी आवश्यक आहे.
सलग तिसऱ्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेकडे जात असल्याने हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील रब्बी, उन्हाळी व बारमाही पिकांसाठी पाणीपुरवठा निश्चित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाची चिंता दूर झाली आहे.
पूराचा धोका आणि सतर्कतेचा इशारा
धरणातून विसर्ग सुरू झाल्यास नदीपात्रातील पाणीपातळी झपाट्याने वाढेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूरपरिस्थिती टाळण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी खालील सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
महत्त्वाच्या सूचना
* नदीपात्रातील विद्युत मोटारी तातडीने बाहेर काढाव्यात
* वाहनं व गुरं नदीपात्रात आणू नयेत
* नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये
* मासेमारी बंद ठेवावी
येलदरी आणि खडकपूर्णा प्रकल्पातील परिस्थिती
येलदरी धरण सध्या ९०% भरले आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून दर सेकंदाला १ हजार घनफूट पाणी सोडले जात असून, पुढील दोन दिवसांत येलदरीचे टर्बाइन सुरू करून पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. यामुळे सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी आणखी वाढेल आणि विसर्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, शेतकरी आणि नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे धोक्याचा अंदाज घेऊन वेळेत खबरदारी घेतल्यास मोठ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकतो.