Maharashtra Rain : राज्यभरात मान्सूनच्या पावसाचा जोर (Heavy Rain) वाढताना दिसत आहे. या अनुषंगाने हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भात आणि नाचणीची लागवड स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल, अशा जिल्ह्यात या सूचना दिल्या असून यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा समावेश आहे.
जून आणि जुलै महिन्यात पावसाचे सरासरी काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर (Rain alert) वाढताना दिसत असून राज्यातील विविध भागात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. यातच 25 जुलै आणि 26 जुलै रोजी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्येही कोकण आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, पालघर आणि मध्य महाराष्ट्राच्या सह्याद्री घाट परिसरात म्हणजेच नाशिक, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात 25 जुलै आणि 26 जुलै रोजी नाचणी व भात पिकाच्या लागवडीसाठी स्थगिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यासोबतच पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भात लागवड स्थगितीच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
राज्यात आज आणि उद्या म्हणजेच 25 जुलै आणि 26 जुलै नंतर पावसाचा जोर काहीसा कमी होणारा असून दोन दिवसानंतर सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर रायगड, पुणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.