Paddy Plantation : रामटेक तालुक्यात यंदा मान्सूनने सुरुवातीला काही दिवस दमदार हजेरी लावली असली, तरी मागील १३ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार संकट ओढावले आहे. (Paddy Plantation)
पाण्याअभावी धानाचे पन्हे सुकण्याच्या मार्गावर असून, रोवणी रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे 'पेंच' (Pench) जलाशयातील पाणी तातडीने कालव्यात सोडावे, अशी जोरदार मागणी शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधींकडून होत आहे.(Paddy Plantation)
शेतकऱ्यांची अडचण गंभीर
रामटेक तालुक्यातील सुमारे ७० टक्के शेती पेंच (Pench) जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या जलाशयामुळे जवळपास ७० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. याच भागात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
मात्र, कालव्याशिवाय दुसरे कोणतेही सिंचन स्रोत उपलब्ध नसल्यामुळे, रोवण्या पूर्णपणे कालव्यातून येणाऱ्या पाण्यावरच अवलंबून आहेत. पाऊस न पडल्यामुळे अनेक भागांत धानाची पन्हे सुकत आहेत, आणि वेळेवर रोवण्या होऊ न शकल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जलाशयांची स्थिती
तोतलाडोह जलाशय (पारशिवनी तालुका) : ६३.६८% जलसाठा (क्षमता : १,१६६ दलघमी)
पेंच जलाशय : केवळ २१% जलसाठा (क्षमता : १८० दलघमी)
खिंडसी जलाशय : ५०% जलसाठा (क्षमता : १०३ दलघमी)
सद्यस्थितीत या तीनही जलाशयांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा नाही. यंदा पावसामुळे केवळ १० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तोतलाडोह जलाशयातून पाणी सोडल्यास ते थेट 'पेंच'मध्ये गोळा होते आणि शेतकऱ्यांना रोवणीसाठी आवश्यक पाणी मिळू शकते.
शेतकऱ्यांची मागणी
पेंच जलाशयातील पाणी तातडीने कालव्यात सोडावे, अशी मागणी रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपाण, माजी सभापती लक्ष्मण उमाळे, अनिल कोल्हे, भूषण घरजाडे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
रोवण्या रखडल्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांनाही काम मिळत नसल्याने, रोजंदारीवरही परिणाम झाला आहे.
महत्त्वपूर्ण निर्णयासाठी बैठक
पेंच पाटबंधारे विभागाने २५ जुलै रोजी बैठक बोलावली असून, या बैठकीत शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
नेमके किती पाणी सोडावे आणि कधी सोडावे, यावर बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती राजू भोमले, उपअभियंता, पेंच पाटबंधारे विभाग, रामटेक यांनी दिली.
पावसाची आकडेवारी
जून महिन्याची सरासरी : १७५.२ मिमी
जूनमध्ये पडलेला पाऊस : ११८.३ मिमी
१ जून ते २१ जुलै दरम्यानची सरासरी : २३४.८ मिमी
या वर्षी पडलेला पाऊस (१ जून – २१ जुलै) : ३७३.३ मिमी
तथापि, या पावसात फक्त तीन दिवसच दमदार पाऊस झाला, त्यामुळे सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.
रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या काळजीची स्थिती आहे. वेळेवर पाणी मिळाले नाही, तर पिकांचे नुकसान होऊन अन्नसुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने पेंच जलाशयाचे पाणी तातडीने सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Paddy Plantation : पावसाने मारली दांडी; धान रोवणी संकटात वाचा सविस्तर