Ola Dushkal : सध्या महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे भीषण संकट उभे ठाकले आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. नेमका ओला दुष्काळ म्हणजे, तो कधी जाहीर करतात, त्याचे निकष काय आहेत, हे समजून घेऊयात...
ओला दुष्काळ म्हणजे काय ?
एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत वा, नेहमीचे पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे (अतिवृष्टीमुळे) पिकांची झालेली हानी, पूरामुळे जीव व वित्तहानी, पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती उदभवणे होय. ही परिस्थिती दुष्काळाच्या बिलकुल विरुद्ध असते.
अतिवृष्टीमुळे न भरून निघणारे नुकसान
आपण गेल्या आठवडाभरापासून पाहत आहोत की, मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतच नाही तर जमीन सुद्धा वाहून गेली आहे. पिकांसोबत शेतजमीन, घरे, जनावरे आदींचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार होते आहे.
कोरडा दुष्काळ व ओला दुष्काळ मधील फरक
बाब
कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ
पाऊस कमी किंवा नाही पुरेसा किंवा जास्त
परिणाम पिकांना पाणी मिळत नाही पिकांना पाणी मिळते पण नुकसान होते
कारण पर्जन्याचा अभाव पाण्याचे असमान वितरण
जाहीर करण्याचे निकष काय?
पर्जन्यमान : पावसाचे असमान वाटप. कमी कालावधीत जास्त पाऊस.
पिकांचे नुकसान :पूर, पाण्याचा निचरा न होणे, जमीन पाण्याखाली असणे
जमिनीतील ओलावा : मातीतील ओलाव्याचे प्रमाण जास्त असणे.
हवामान व स्थानिक परिस्थिती : पावसाचा कालावधी, तीव्रता, वितरणाचा अभ्यास
सरकारी मूल्यांकन : कृषी विभाग व हवामान खात्याचे अहवाल.
ओला दुःष्काळ जाहीर झाल्यास...
- पीक विमा / आपत्ती मदत
- कर्जमाफी / कर्ज फेडायला मुदतवाढ
- महसूल वसुली थांबवली जाते (वीज, पाणीपट्टी
- घर, जनावरे, शेततळे यासाठी नुकसान भरपाई
- रोजगार हमी योजना (EGS)
- चारा छावण्या, अन्नधान्य, आरोग्य शिबिरे
ओला दुष्काळ हा सततचा पाऊस व पाण्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे होणारी नैसर्गिक आपत्ती आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. आणि सद्यस्थितीत हेच चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे.