Rain Orange Alert : उन्हाचे चटके जाणवत असताना राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे १८ मार्च रोजी म्हणजेच आजच्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई वेधशाळेने केले आहे.
मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील तीन तास महत्वाचे आहेत. या तीन तासांत राज्यातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
त्यानुसार तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ४०-५० किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी अलर्ट
तसेच नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी दि. १९ मार्च २०२६ रोजी (ऑरेंज अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा ५०-६० किमी प्रतितास वेगासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच घाट प्रक्षेत्रात तुरळक ठिकाणी दि. १९ मार्च २०२६ रोजी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा ४०-५० किमी प्रतितास वेगासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी दिली आहे.
