Marathwada Weather Update : मराठवाड्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हालचाल सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दमदार पावसाची नोंद झाली असून बीड, लातूर, धाराशिवमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Marathwada Weather Update)
जालना, परभणी, हिंगोलीत मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उकाडा जाणवत आहे. पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची चिन्हं दिसत असल्याने शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.(Marathwada Weather Update)
मराठवाड्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होत असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन तर काही ठिकाणी उकाड्याचा त्रास जाणवतो आहे. तर अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.(Marathwada Weather Update)
छत्रपती संभाजीनगरसह आठ जिल्ह्यांचा हवामान अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या सुरक्षेसाठी योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.(Marathwada Weather Update)
मराठवाड्यातील हवामान
मराठवाड्याच्या बहुतांश भागात हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहील. काही भागांत मध्यम पावसाची शक्यता असून विजांच्या गडगडाटासह वातावरणात गारवा जाणवेल.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दमदार पावसाची हजेरी
मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरात दुपारनंतर पावसाने चांगली हजेरी लावली. चिकलठाणा वेधशाळेच्या नोंदीप्रमाणे शहरात सायंकाळपर्यंत २१.४ मिमी पाऊस झाला असून सकाळी ८.३० पर्यंत ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारीही शहरात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जालना, परभणी, हिंगोलीत पावसाला विश्रांती
जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून पावसाला विश्रांती मिळाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले आहे. या जिल्ह्यांसाठी कोणताही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बीड, धाराशिव, लातूरमध्ये विजांचा कडकडाट
बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात या भागांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
शेतकऱ्यांना सल्ला
* विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतात काम करताना काळजी घ्या.
* पाऊस किंवा वीज सुरू असताना उंच झाडांखाली, लोखंडी साधनांजवळ थांबू नका.
* जमिनीची मशागत पूर्ण ठेवून बियाणे, खतांची पूर्वतयारी करून ठेवावी.