Marathwada Dam Water Level : मराठवाड्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने विभागातील सर्व प्रमुख धरणे जलाशयांनी ओसंडून वाहू लागली आहेत. (Marathwada Dam Water Level)
मोठे, मध्यम आणि लघु अशा सर्व प्रकल्पांमध्ये एकूण ९० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा जमा झाला असून, यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर लघु-मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याची नोंद झाली आहे.(Marathwada Dam Water Level)
जायकवाडी ९९ टक्के भरले
मराठवाड्याचे जीवनदायी मानले जाणारे जायकवाडी धरण तब्बल ९९ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने तसेच नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतून ३६ हजार ६१९ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाण्याचा वाढता वेग लक्षात घेऊन प्रशासनाने ४७ हजार १६० क्युसेक पाणी विसर्ग सुरू केला आहे.
मराठवाड्यातील एकूण ११ मोठ्या प्रकल्पांत ९७ टक्के जलसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. त्यातील मांजरा, उर्ध्व पेनगंगा, निम्न मनार आणि निम्न तेरणा ही धरणे १०० टक्के भरली आहेत.
मध्यम प्रकल्पांत ९३ टक्के साठा
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ९३ टक्के साठा आहे.
बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील २४ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
नांदेडमधील ९ प्रकल्पांत २६ टक्के,
लातूरमधील ८ प्रकल्पांत २० टक्के,
जालन्यातील ७ प्रकल्पांत २२ टक्के,
तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत ७८ टक्के जलसाठा आहे.
लघु पाटबंधारे प्रकल्पांत ९१ टक्के साठा
मराठवाड्यात एकूण ७५४ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प स्थानिक गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी महत्वाचे मानले जातात. यामध्ये सरासरी ९१ टक्के जलसाठा आहे.
नागरिकांना आणि शेतकऱ्यांना इशारा
धरणांमध्ये जलसाठा जवळपास पूर्ण क्षमतेला पोहोचल्याने सतत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.