बापू सोळुंके
मराठवाड्यातील पावसाचा पॅटर्न झपाट्याने बदलत असून याचा थेट परिणाम शेती आणि पिकांच्या उत्पादनावर होत आहे. यंदा जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या (८६ दिवसांच्या) कालावधीत सरासरी ४३ दिवस पाऊस झाला. (Marathawada Weather Update)
गतवर्षी याच काळात ही संख्या ३८ दिवसांपर्यंत मर्यादित होती. त्यामुळे पावसाचे दिवस वाढले असले तरी तो असमान झाल्याने काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागांमध्ये अत्यल्प पाऊस पडला. (Marathawada Weather Update)
जिल्हानिहाय पावसाचे दिवस
छत्रपती संभाजीनगर जिल्हा : जून – ११ दिवस, जुलै – १३ दिवस, ऑगस्ट – १२ दिवस (एकूण ३६ दिवस)
जालना जिल्हा : जून – १० दिवस, जुलै – १४ दिवस, ऑगस्ट – १२ दिवस (एकूण ३६ दिवस)
बीड जिल्हा : जून – ८ दिवस, जुलै – ८ दिवस, ऑगस्ट – १२ दिवस (एकूण २८ दिवस)
या तीन जिल्ह्यांचा सरासरी पावसाचे दिवस : ४३
२.५ मिमीपेक्षा अधिक पावसाचे दिवस
हवामान विभागाच्या नियमानुसार, एखाद्या दिवशी २.५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यास तो दिवस पावसाचा दिवस म्हणून गणला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण आणि वितरण अनियमित झाले आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील काही हंगामांमध्ये पावसाळ्यातील ८६ दिवसांच्या कालावधीत सरासरी फक्त ४१ दिवस पाऊस नोंदवला गेला.
शेतीवर परिणाम
बदलत्या पावसामुळे खरीप हंगामातील पीकपद्धती धोक्यात आली आहे. पावसाचे दिवस कमी-जास्त झाल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी यांसारख्या खरीप पिकांचे उत्पादन घटते.
काही तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्याखाली जातात.तर अनेक भागांमध्ये कमी पावसामुळे पेरणी अयशस्वी ठरते.
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत पावसाचे दिवस ३६ इतके झाले असले तरी वितरणातील असमानता गंभीर आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय. बदलत्या पॅटर्ननुसार पिकपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे.- प्रकाश देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक