Join us

Marathawada Rain Update : मे मध्ये धुमाकूळ, जून-जुलै कोरडे; मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 11:42 IST

Marathawada Rain Update : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या धुमाकूळानंतर जून-जुलैमध्ये मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाळा सुरू होऊन ५१ दिवस उलटले तरी त्यापैकी तब्बल ३६ दिवस कोरडे गेलेत. उरलेल्या दिवसांतही समाधानकारक पाऊस न झाल्याने मराठवाड्यात पिके माना टाकू लागली आहेत. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं आहे. (Marathawada Rain Update)

विकास राऊत

मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे. पावसाळा सुरू होऊन ५१ दिवस उलटले तरी त्यातील तब्बल ३६ दिवस कोरडे गेले आहेत. (Marathawada Rain Update)

उर्वरित १५ दिवसांतही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच जमिनीची ओल गेलेली असताना आता पिके माना टाकू लागली आहेत आणि दुबार पेरणीचे संकट डोक्यावर येऊन ठेपले आहे.(Marathawada Rain Update)

मे मध्ये धुमाकूळ, जून-जुलै कोरडे

मे महिन्यात १८ दिवस पावसाने हजेरी लावून तब्बल १९३ मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस मे महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल १५१०% अधिक होता. आठही जिल्ह्यांत १५० मि.मी.हून अधिक पाऊस झाला. मात्र, जून आणि जुलैमध्ये मात्र पावसाने दडी मारली.

जूनमध्ये १६० मि.मी. सरासरीच्या तुलनेत केवळ १३४ मि.मी. (७९%) पाऊस.

जुलैमध्ये आतापर्यंत १२६ मि.मी. सरासरीच्या तुलनेत केवळ ७९ मि.मी. (६३%) पाऊस.

सध्या विभागात सरासरीच्या तुलनेत ८७ मि.मी. तूट आहे.

पिकांचे हाल, दुबार पेरणीचा धोका

पाऊस न झाल्यामुळे शेतात पिके माना टाकू लागली आहेत. उभी पिके वाळत असून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे बियाणे व मजुरीचा खर्च दुप्पट होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

धरणांची स्थिती समाधानकारक

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ५९ जलसाठा आहे. जूनपासून आतापर्यंत जायकवाडी धरणात १० दलघमी पाणी आले आहे. येलदरीसह काही धरणांत जलसाठा चांगला असला तरी काही धरणांत पातळी खालावलेली आहे.

जायकवाडी : ७७%

येलदरी : ८६%

विष्णुपुरी : ६८%

निम्न दुधना : ४३%

सिद्धेश्वर : २७%

माजलगाव : १०%

मांजरा : २४%

सीना कोळेगाव : ५१%

जिल्हानिहाय झालेला पाऊस (मि.मी.)

जिल्हापाऊस
छ. संभाजीनगर२२८
जालना२४५
बीड२६२
लातूर२१९
धाराशिव३२०
नांदेड२९३
परभणी३२५
हिंगोली२६०

पुढचा पाऊस कधी?

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मान्सूनचं चक्रच बिघडलं. जून कोरडा गेला आणि जुलैमध्येही समाधानकारक पाऊस नाही. बंगालच्या उपसागरात पावसाला पोषक वातावरण नसल्यामुळे विदारक स्थिती आहे. २४ जुलैनंतर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. - कैलास डाखोरे, हवामानतज्ज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

हे ही वाचा सविस्तर : Marathawada Rain Update : २५ वर्षांतील विक्रम मोडला: मराठवाड्यात विक्रमी 'मे'मधील पाऊस वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमराठवाडापाणीधरणशेतकरीशेती