Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण कायम राहिल्यामुळे थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. (Maharashtra Weather Update)
नागपूरकरांसह राज्यातील नागरिकांना मागील आठवडाभर उबदार हवामानाचा अनुभव येत होता परंतु आता थंडी ओसरल्याची भावना निर्माण झाली आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान तज्ज्ञांच्या मते हे वातावरण तात्पुरते असून आकाश निरभ्र होताच किमान तापमानात पुन्हा घसरण होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
१५ जानेवारीनंतर नागपूरच्या किमान तापमानात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. १० ते १३ अंशांच्या दरम्यान असलेले किमान तापमान २० जानेवारीला थेट १५ अंशांवर पोहोचले. त्यानंतर १.३ अंशांची घट होत तापमान १३.७ अंशांवर आले, तर गुरुवारी (२२ जानेवारी)रोजी पुन्हा १४.२ अंशांची नोंद झाली. त्यामुळे सध्या थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे जाणवत आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणाम
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रत्यावर्ती वर्तुळाकार चक्रीय वारे सक्रिय आहेत.
त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून ताशी २५ ते २७ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
२६ जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा
या हवामान बदलामुळे राज्यात अवकाळी पावसाचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहिल्यानगर आणि ठाणे (नाशिक लगतचा भाग) या सात जिल्ह्यांमध्ये २६ जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत आधीच पावसाचे ढग जमा झाले असून, प्रजासत्ताक दिनापर्यंत हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज आहे.
तापमानात वाढ, धुक्याचे सावट
गेल्या ४८ तासांत राज्यातील किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. काही भागांत कमाल तापमान ३३ ते ३५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून, थंडी कमी होऊन उकाड्याची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.
ढगाळ वातावरणामुळे पहाटेच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता असून, याचा परिणाम रस्ते व रेल्वे वाहतुकीवर होऊ शकतो.
रब्बी पिकांसाठी धोका
हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे शेती क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. ढगाळ वातावरण व आर्द्रतेमुळे तूर, हरभरा, ज्वारी यांसारख्या रब्बी पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
तसेच आंबा आणि काजू पिकांना सध्या आलेल्या मोहोरावर अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होऊन मोहोर गळण्याचा किंवा बुरशीजन्य रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
उशिरा पेरणी झालेल्या मका आणि गहू पिकांच्या वाढीवरही वाढत्या तापमानाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा
बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे राज्यात आर्द्रता वाढली आहे. शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणीला आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तास ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर ढग हटताच किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घसरण होऊन पुन्हा थंडी परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
