Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सलग काही दिवस मुक्काम ठोकून बसलेला पाऊस अखेर माघारी फिरताना दिसत आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहिती नुसार, राज्याच्या बहुतांश भागांमधून पावसाळी ढगांनी माघार घेतली असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अजूनही ढगाळ वातावरण कायम आहे. या परिस्थितीमुळे दिवसा हलका उकाडा आणि रात्री गारवा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अजूनही पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांमध्ये कोकणाच्या दक्षिणेकडील जिल्हे व मध्य महाराष्ट्र या भागांत मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका राहू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
सकाळी गारवा जाणवेल
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. सकाळच्या सुमारास थंड वाऱ्याची झुळूक आणि दुपारी सूर्यप्रकाशाचा ताप जाणवेल. दिवस मावळतीला गेल्यानंतर गारठ्याची जाणीव होऊ लागेल. हीच स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
तापमानात घट, थंडीची चाहूल
मुंबईत अंशत: ढगाळ हवामान राहणार असून, दिवसाच्या वेळेत उकाडा जाणवेल. तर पहाटेच्या वेळी हवेत थोडासा गारवा अनुभवता येईल. महाबळेश्वर, निफाड, गोंदिया, भंडारा आणि कोकणातील घाटमाथ्यांवर मात्र तापमानात घट नोंदवली जात असून, महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १२.६ अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवण्यात आले आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यातील किमान तापमानात सातत्याने घट होण्याची शक्यता आहे. यामुळे हिवाळ्याची सुरुवात अधिक ठळकपणे जाणवणार आहे.
आरोग्याची काळजी घ्या
हवामानातील या चढ-उतारामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः थंडी, सर्दी-खोकला आणि ताप यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. सकाळ-संध्याकाळच्या वेळी उबदार कपड्यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पिकांच्या सिंचन आणि खत व्यवस्थापनाची वेळ हवामानाशी समन्वयाने ठरवा.
* थंडी वाढल्यास सकाळी शेतात काम करताना उबदार कपड्यांचा वापर करा.
