Maharashtra Rain Update : पावसाळा संपत आलाय असे वाटत असतानाच राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान विभागाने २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान विदर्भासह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या काळात गडगडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)
कमी दाबाचे क्षेत्र आणि मान्सून माघारीचा विलंब
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे. नैऋत्य मान्सून गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून माघार घेत आहे.
मात्र, विदर्भात परतीच्या प्रवासाला अजून विलंब असून, ५ ते १० ऑक्टोबरदरम्यानच मान्सून माघार घेईल, असा अंदाज आहे.
कोणत्या भागात कधी पाऊस?
२४ ते २७ सप्टेंबर : विदर्भात अतिजोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता.
२४-२५ सप्टेंबर : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गडगडाटी, विखुरलेला पाऊस.
२६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव भागात मध्यम ते जोरदार पाऊस.
कोकण : हलका ते मध्यम पाऊस, मात्र काही ठिकाणी मुसळधार सरी.
शेतीसाठी धोका
२६ सप्टेंबरनंतर कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या खरीप पिकांना मोठा फटका बसू शकतो.
शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान अभ्यासकांनी केले आहे.
तापमान आणि उकाडा
दरम्यान, दोन दिवसांपासून आकाश निरभ्र झाल्याने तापमान वाढले आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास होत असून, पावसाची प्रतीक्षा अधिकच वाढली आहे.
राज्यात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय झाले आहे. पुढील चार दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल. गारपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी.- अभिषेक खेरडे, हवामान अभ्यासक , थोतरखेडा (अचलपूर)
एकंदरीत, राज्यात परतीच्या मान्सूनपूर्वीच पावसाचा जोरदार फटका बसणार आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सतर्कतेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतात पाणी साचू देऊ नका, निचऱ्याची सोय करा.
* कापसात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फेरफटका मारा.
* सोयाबीन पिकली असल्यास काढणी उशीर करू नका.