Join us

Maharashtra Weather Update : IMD अलर्ट : मराठवाड्यासह या जिल्ह्यांना हवामान विभागाने काय दिला इशारा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 09:28 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाची सरबत्ती होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील ४८ तासांसाठी कोकण ते विदर्भ, मुंबई ते मराठवाडा विभागात कसे असेल हवामान जाणून घ्या सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाची सरबत्ती होण्यास सुरुवात झाली आहे. कोकण ते विदर्भ, मुंबई ते मराठवाड्यात हवामान विभागाचा यलो अलर्ट २३ जिल्ह्यांसाठी जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात हवामानात सातत्याने बदल जाणवत असून गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा धोका असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Weather Update)

मुंबईत शनिवारपासून जोर वाढणार

मुंबईत आज (१२ सप्टेंबर) पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील. काही भागांत रिमझिम सरी बरसतील, परंतु मुसळधार पावसाची शक्यता नाही. आभाळ ढगाळ राहून वातावरण आल्हाददायक होईल, मात्र आर्द्रतेमुळे उकाडाही जाणवेल. शनिवारपासून पुढील दोन दिवस शहरासह ठाणे व नवी मुंबईत जोरदार पावसाचा इशारा आहे.

कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण

पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज तुरळक सरी पडतील, तर डोंगराळ व किनारी भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. १३ सप्टेंबरपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचे प्रमाण वाढेल.

मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे, तर धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल.

उत्तर महाराष्ट्रातही पावसाची चिन्हे

उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. 

दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

२३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील ११ जिल्हे, मराठवाड्यातील ६ जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील ४ जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खबरदारीचे आवाहन

किनारपट्टी भागातील नागरिकांनी समुद्र किनाऱ्याजवळ जाणे टाळावे.

डोंगराळ व नाल्याजवळच्या भागांत राहणाऱ्यांनी सतर्कता बाळगावी.

शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

कोकणासह संपूर्ण राज्यात पुढील ४८ तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

* पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधबंदिस्ती, निचरा आणि पिकांचे संरक्षण याकडे विशेष लक्ष द्या, असा सल्ला देण्यात आला आहे. 

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : कोकणात हलक्या सरी; 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा