Maharashtra Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने मोठे बदल होत आहेत. मध्येच कडक ऊन तर मध्येच अवकाळी पाऊस अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.(Maharashtra Weather Update)
फेब्रुवारी महिन्यातच राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी तसेच नागरिक चिंतेत आहेत.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला असून काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.(Maharashtra Weather Update)
'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील तीन दिवसांत नांदेड, वर्धा, परभणी, बीड आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसासह काही भागांत गारपीटही झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तापमानात मोठी तफावत
राज्यातील किमान तापमानाची नोंद धुळे येथे १२.४ अंश सेल्सिअस इतकी झाली, तर अकोला येथे उच्चांकी तापमान ३६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तापमानातील या तीव्र बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, ताप, घसा खवखवणे यांसारख्या तक्रारी वाढत आहेत.
गारपिटीचा शेतीला फटका
२३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार काही भागांत जोरदार गारपीट झाली.
यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील जांब-जुली पारवा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावातही रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली ज्वारी अवकाळी पावसामुळे पूर्णपणे खराब झाली.
खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामातील पीकही हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शेतकऱ्यांची मदतीची मागणी
सततच्या हवामान बदलामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
राज्यात पुढील काही दिवस हवामानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके काढणीस तयार असतील तर शक्य असल्यास तातडीने काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करा.
* मळणी केलेले धान्य उघड्यावर न ठेवता ताडपत्रीने झाकावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
