Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत परत एकदा मान्सून जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून कोकण, विदर्भासहपुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यात समाधानकारक पाऊस तर विदर्भात बरसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील स्थिती
मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून पावसाची कमरता भरून निघाली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत. मात्र, दुसरीकडे विदर्भात जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही भागांत पूरसदृश्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाची विश्रांती
गेल्या चार दिवसांत पावसाला विश्रांती मिळाल्यानंतर आजपासून पुन्हा पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात मागील २४ तासांत ०.८ मिमी पाऊस झाला असून आज ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान २९ अंश राहण्याचा अंदाज आहे.
पुणे (शिवाजीनगर) जिल्ह्यात मागील २४ तासांत ६.६ मिमी पाऊस झाला. पुढील २४ तासांत घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस आणि यलो अलर्ट जारी आहे. तापमान ३० अंशांच्या आसपास राहील.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ०.१ मिमी पाऊस झाला. आज घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची शक्यता असून कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.
सोलापूर आणि सांगलीत उघडीप
सोलापूर आणि सांगलीत पावसाची उघडीप सुरू आहे.मागील २४ तासांत तापमान ३३.७ अंश सेल्सिअस राहिले असून आज हलक्या सरींसह तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
सांगली जिल्ह्यात मागील २४ तासांत १ मिमी पाऊस झाला असून आज ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तापमान ३० अंश सेल्सअस राहील.