Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचं चित्र बदललंय आहे. कोकण-मुंबईत आकाश निरभ्र झाले असले, तरी विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना, आता कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत आकाशात चटका देणारी ऊनसावली दिसू लागली आहे. मात्र, विदर्भात अजूनही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.(Maharashtra Weather Update)
मुंबई-कोकणात ऊनसावलीचा खेळ
मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणातील अनेक भागांत आकाश निरभ्र झाल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टीवर सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा मागे सरकल्यामुळे हा बदल झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना हलक्या सरींसह ऊनसावलीचा अनुभव येईल.
विदर्भात ऑरेंज अलर्ट कायम
विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज (११ जुलै) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुपारनंतर या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
घाटमाथ्यावरही अलर्ट
पुणे, रायगड, नाशिक आणि चंद्रपूरच्या घाटमाथ्यांवर आज जोरदार पावसाची शक्यता असून, संबंधित प्रशासन व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील पावसाने घेतला का ब्रेक?
राज्यात पावसाचे प्रमाण का कमी झाले यावर हवामान विभागाने(IMD) दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्यामुळे कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने ब्रेक घेतला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरापासून राजस्थानपर्यंत पूर्वेकडे एक नवीन कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात अजून काही दिवस पावसाची उपस्थिती राहणार आहे.
पुढचे ४–५ दिवस कसे राहील?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे चार ते पाच दिवस विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. मुसळधार पावसाचा धोका फारसा नाही, मात्र विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशारा कायम आहे. मुंबई व ठाण्यात हलक्याशा सरींसह ऊनसावलीचे वातावरण राहील.
शेतकऱ्यांना सल्ला
विदर्भात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे उघड्यावर ठेवलेला कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा बियाणे किंवा इतर शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.