Join us

Maharashtra Weather Update : आषाढीची भक्ती अन् पावसाचा ध्यास; पुण्यासह कोकण किनाऱ्यास ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 17:16 IST

Maharashtra Weather Update : राज्यात आषाढी एकादशीनिमित्त पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडणार असून पुण्यासाठी रेड अलर्ट तर कोकण किनाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात आषाढी एकादशीच्या (६ जुलै) पार्श्वभूमीवर पावसाची जोरदार हजेरी लावणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळेल.(Maharashtra Weather Update)

काही जिल्ह्यांत गारपीट व पूरसदृश स्थितीचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  विशेषत: पुणे व घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट, तर कोकण व ठाणे किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस?

पुणे, घाटमाथा परिसर 

गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसाचा जोर कायम असलेल्या घाटमाथ्यावर आज (६ जुलै) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी आहे. काही भागांत दरड कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण व ठाणे 

ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे किनारपट्टीच्या सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी मात्र यलो अलर्ट जारी आहे. मुंबईत ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली 

या भागांत आज मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

विदर्भ 

नागपूर, अमरावती व चंद्रपूर येथे हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागपूर, चंद्रपूरसाठी यलो अलर्ट आहे.

उत्तर महाराष्ट्र 

नाशिक व जळगावमध्ये मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपिटीचा धोका वर्तवण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहील.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगा

हवामान विभागाने सांगितले आहे की, ६ व ७ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्र व कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदीकिनारी, डोंगराळ भागात वसलेल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठवाड्यात मध्यम पाऊस

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुढील ३–४ तासांत हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पावसाचा जोरदार हजेरीमुळे शेतीला दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहा.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : मराठवाड्यासह महाराष्ट्रात पावसाचा जोर; कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडामुंबईपुणे