Maharashtra Rain : गुणधर्माप्रमाणे समुद्र सपाटीपासुन २ ते ४ किमी. उंचीपर्यंत तळ असणाऱ्या 'निंबो-स्ट्रॅटस' प्रकारच्या ढगातून सातत्य ठेवून संथ गतीने थंडावा पसरवणारा हा मघा नक्षत्राचा पाऊस आहे. ऑगस्ट महिन्यातील, बेभरवशाच्या या 'मघा ' नक्षत्रात, ह्या वर्षी, एम.जे.ओ. व वर उल्लेखित वातावरणीय प्रणाल्यांच्या साथीतून, महाराष्ट्रात सध्या पाऊस होत आहे.
शनिवार दि. १६ ते उद्या बुधवार दि. २० ऑगस्ट पर्यंतच्या पडणाऱ्या पाच दिवसातील मध्यम ते जोरदार पावसाच्या हजेरीनंतर, परवा गुरुवार दि. २१ ऑगस्ट सकाळपासुन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. शुक्रवार दि. २२ ऑगस्टला तर पावसाचा जोर अधिकच ओसरेल.
मात्र, मंगळवार ते गुरुवार, दि.२६ ते २८ ऑगस्ट (ऋषींपंचमी ते हरतालिका) दरम्यान, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ खान्देशातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता शक्यता जाणवते.
ही शक्यता रविवार दि.२४ ऑगस्ट दरम्यान, बंगालच्या उपसागरात एम.जे.ओ.च्या प्रवेशामुळे, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती व वायव्य दिशेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे जाणवते. त्यामुळे .....
पूर-परिस्थिती
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील उगम पावणाऱ्या नद्यांबरोबरच विदर्भ खान्देशांतील नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गासह, धरण जलसाठ्याच्या टक्केवारीच्या वाढीतील सातत्य पुढील आठवड्यातही टिकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणत्या वातावरणीय प्रणाल्या सध्या पावसासाठी पूरक ठरत आहे.
- ओरिसा-छत्तीसगड सीमेवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र
- समुद्र सपाटी पासुन दिड किमी. उंची पर्यंतचा दीव, सुरत नंदुरबार अमरावती व वरील कमी दाब क्षेत्रातून बं. उपसागरापर्यंत पोहोचणारा, हवेच्या कमी दाब क्षेत्राचा मान्सूनचा आस त्याच्या सरासरीच्या जागेपासून अजूनही दक्षिणेकडेच स्थिरावल्या मुळे
- अरबी समुद्र व गुजरात राज्यावर ५.८ ते ७.६ किमी. उंचीवरील आवर्ती चक्रीय वारा स्थिती
- निम्न तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून ३.१ व ४.५ किमी. उंचावर एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या असमान वेगवान वाऱ्याचा शिअर झोन
- गुजराथ ते केरळ राज्याच्या किनारपट्टी समांतर अरबी समुद्रात तयार झालेली हवेच्या कमी दाबाची द्रोणीय स्थिती किंवा घळ
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.