Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत असून हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५ जिल्ह्यांसाठी यलो व ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. (Maharashtra Rain Alert)
सोमवारी विदर्भात झालेल्या मुसळधार पावसापाठोपाठ (Heavy Rain) आज (८ जुलै) रोजी अनेक भागांत दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Rain Alert)
कोकण, घाटमाथा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जाणवणार आहे. पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(Maharashtra Rain Alert)
मुंबई-कोकण: रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, चार जिल्ह्यांना यलो
मुंबईत आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी झाला आहे.
उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र यलो अलर्ट
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात अतिवृष्टीचे प्रमाण तुलनेत कमी राहणार असले तरी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यात ऑरेंज, घाटात जोरदार पाऊस
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. साताऱ्यातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात सहा जिल्ह्यांत यलो अलर्ट
मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि पावसाचा जोर राहणार आहे. परभणी आणि नांदेडच्या काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.
विदर्भ मुसळधार पावसाचा कहर, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असून चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या आठ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. अकोल्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
काळजी घ्या
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नद्या, नाले, घाट रस्त्यांवर सतर्क राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* शेतात पाणी साचू नये यासाठी निचऱ्याच्या मार्गांची सफाई करून ठेवा.
* भात रोपे लावणी करताना पाणी कमी असलेल्या शेतांमध्ये पाणी साचल्यास रोपे कुजू शकतात, त्यामुळे योग्य पाणी निचरा करा.
* कापूस, सोयाबीन, तूर अशा उभ्या पिकांमधील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी चर तयार करा.
* पिकांवर बुरशीजन्य रोग येऊ नयेत म्हणून गरजेनुसार शिफारस केलेली औषधे फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.