नाशिक : दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिक जिल्ह्याला (Nashik District) पावसाने झोडपून काढले. त्यामुळे आज २७ जुलै रोजी नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यामधुन सुरु असलेला १५ हजार ७७५ क्युसेक्स विसर्ग हा दुपारी ३ वाजता ३९४२ क्युसेक्सने वाढ करून एकूण १९ हजार ७१७ क्युसेक्स सोडण्यात आला आहे.
सद्यस्थितीत जायकवाडी धरण (Jayakawadi Dam) ८० टक्क्यांवर असून नांदूरमाध्यमेश्वर बंधाऱ्यातून सुरु असलेल्या विसर्गामुळे जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच नांदूरमध्यमेश्वरमधून होत असलेल्या विसर्गात टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे. तरी प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
श्रावणसरी कायम : पाच दिवस पावसाचेच
तब्बल दहा दिवस विश्रांती घेतल्यानंतर श्रावणाच्या स्वागतासाठी कोसळणाऱ्या वरुणराजाने शनिवारीही आपली हजेरी कायम ठेवल्याने ३६ तासांत ४०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून १२.४ मिमी पाऊस कोसळला असून, मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकमध्ये यंदा तब्बल दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तवला असून, त्यानुसार पावसाची रिमझिम कायम राहणार आहे.