Jayakwadi Dam Water Release Update : नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. याच पावसामुळे जायकवाडी धरणातीलपाणीसाठा ९६.२० टक्क्यांवर पोहोचला आहे.(Jayakwadi Dam Water Release Update)
गुरुवारी सकाळी धरणाचे १८ दरवाजे अडीच फुटांनी उघडण्यात आले. पाटबंधारे विभागाकडून गोदावरी नदीपात्रात तब्बल ४७ हजार १६० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.(Jayakwadi Dam Water Release Update)
जायकवाडी धरणातील पाणीसाठा किती?
धरणाची पाणीपातळी : १५२१.३१ फूट
जिवंत पाणीसाठा : २०८८.५४१ दलघमी
पाण्याची आवक : ५१ हजार ७२५ क्युसेक
विसर्ग : ४७ हजार १६० क्युसेक
दोन टप्प्यांत पाण्याचा विसर्ग
बुधवारी रात्रीपासून जायकवाडीत पाण्याची आवक वाढल्याने प्रथम सकाळी ६ वाजता धरणाचे १८ दरवाजे अर्धा फुट उघडून ९ हजार ४३२ क्युसेक पाणी सोडण्यात आले. मात्र, आवक झपाट्याने वाढल्याने सायंकाळी पुन्हा सर्व दरवाजे अडीच फुटांनी उघडावे लागले. परिणामी गोदावरी नदीपात्रात तब्बल ४७ हजार १६० क्युसेक विसर्ग करण्यात आला.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
जायकवाडीतून सुरू झालेल्या मोठ्या विसर्गामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे. गोदावरी नदीच्या पातळीत अचानक वाढ होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
२१ दिवसांत दुसऱ्यांदा दरवाजे उघडले
३१ जुलै रोजी जलपूजनानंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे प्रथमच उघडण्यात आले होते. त्यावेळी ९ हजार ४३२ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. यानंतर नेमके २१ दिवसांनी गुरुवारी पुन्हा सर्व १८ दरवाजे उघडावे लागले असून, यावेळी पाण्याचा विसर्ग जवळपास ५ पट वाढून ४७ हजार १६० क्युसेकपर्यंत गेला आहे.
नाशिकमधील परिस्थिती
नाशिक जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवून ७ हजार ३७२ क्युसेक पाणी सोडण्यात आले. यामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती.
मात्र, गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूरचा विसर्ग कमी करून ३ हजार ७०६ क्युसेक करण्यात आला असून परिस्थिती आटोक्यात आली आहे.