Jayakwadi Dam Water Level Update : मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेल्या जायकवाडी धरणातीलपाणीसाठा शनिवारी ८०.७२ टक्क्यांच्या वर गेल्याने धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. (Jayakwadi Dam Water Level Update)
यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिलेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.(Jayakwadi Dam Water Level Update)
तीन दिवसांपासून जोरदार पावसाचा परिणाम
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता सुमारे १४ हजार ८०३ क्युसेकने पाणी धरणात येत होते. त्यामुळे साठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास रात्रीच्या सुमारास आणखी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे.
एक महिना अगोदरच ८०% साठा
गेल्या वर्षी जायकवाडी धरणात ऑगस्ट महिन्यात ८० टक्क्यांपर्यंत साठा पोहोचला होता. मात्र, यावर्षी जुलैअखेरीसच हा टप्पा गाठण्यात आला आहे. एकूण धरण साठा २४९०.४६२ दलघमी असून, आतापर्यंत त्यापैकी ८०.७२% साठा जमा झाला आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता अधिक असून, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.
सिंचनासाठी कालव्यांमार्फत पाणी वितरण
धरणातील पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर सिंचनासाठी पाणी वितरणास सुरुवात झाली असून, उजव्या कालव्यातून १,३०० क्युसेक आणि डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
जायकवाडी पाटबंधारे विभागाने पाचही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. धरणातील पाणी सोडण्याच्या स्थितीमध्ये नदीकाठच्या गावांना धोका होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
यंदा जुलैअखेरच ८०% साठा झाला आहे. रात्रीतून पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी सोडावे लागेल. संबंधित जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.- प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग