Dam Water Level Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील लघु प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. (Dam Water Level Maharashtra)
राज्यातील एकूण २५९९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी साठा आता ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच काळात हा साठा फक्त ५१.७७ टक्क्यांवर होता. त्यामुळे यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Dam Water Level Maharashtra)
सप्टेंबरमध्ये दिलासा
सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक प्रकल्प कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा झपाट्याने वाढला. या साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या गरजाही पूर्ण होणार आहेत.
विभागनिहाय साठा (टक्केवारीत)
नागपूर विभाग : ७८.९३% (गतवर्षी ७२.७६%)
अमरावती विभाग : ६९.३२% (गतवर्षी ६९.८७%)
छ. संभाजीनगर विभाग : ६८.५१% (गतवर्षी ३९.९४%)
नाशिक विभाग : ५८.२७% (गतवर्षी ४४.५१%)
पुणे विभाग : ५३.७०% (गतवर्षी ४२.८९%)
कोकण विभाग : ८०.५९% (गतवर्षी ८०.४४%)
संभाजीनगर व नाशिकमध्ये सर्वाधिक वाढ
आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभागांमध्ये साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तर कोकण आणि नागपूर विभाग जलसाठ्याच्या बाबतीत अव्वल ठरले आहेत.
रब्बी हंगामासाठी महत्त्वाचे पाणी
या साठ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाणी नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे.
या पावसामुळे लघु प्रकल्प भरले. आता रब्बीसाठी पाणी मिळेल याची खात्री वाटते. मात्र सरकारने पाणी नियोजन काटेकोर केले पाहिजे.