इमरान खान
अकोला जिल्ह्यात पावसाने (Rainfall in Akola) ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला आहे. मे महिन्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने थोडा दिलासा दिला असला, तरी या पावसाने गेल्या ८२ वर्षांतील सर्वाधिक २४ तासांत झालेल्या पर्जन्यमानाचा विक्रम मोडला आहे.(Akola Weather Update)
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार , १९४३ साली २१ मे रोजी अकोल्यात २४ तासांत ४४.७ मिमी पावसाची नोंद झाली होती, जो आतापर्यंतचा उच्चांक मानला जात होता. मात्र यंदा, २४ तासांत तब्बल ६६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.(Akola Weather Update)
या विक्रमी पावसामुळे पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवार (२१ मे) च्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अकोल्यात गेल्या ८२ वर्षांचा विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आहे.(Akola Weather Update)
उन्हाळ्याच्या तीव्रतेने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Rainfall in Akola)
१३२ वर्षांतील विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर!
हवामान खात्याच्या प्राथमिक माहितीनुसार, मे महिन्यात आतापर्यंत ९५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जर हे प्रमाण असेच वाढत राहिले, तर १८९३ मध्ये झालेल्या १०४.१ मिमी मासिक पावसाचा १३२ वर्षांतील विक्रमही मोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Rainfall in Akola)
पश्चिम विदर्भातही पावसाचा कहर
* बुलढाणा जिल्ह्यात ६२.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, मे महिन्यातील २४ तासांत पडलेल्या पावसाचा २६ वर्षांतील विक्रम मोडला गेला आहे. याआधी १७ मे १९९९ रोजी ५० मिमी पावसाची नोंद झाली होती.
* वाशिम जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम राहिला असून, २४ तासांत ३८.६ मिमी पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली
या पावसामुळे भाजीपाला, फळबागा आणि उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील मूग पिकालाही फटका बसल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याचेही प्रकार समोर आले आहेत.
हवामान खात्याचा इशारा
हवामान विभागाने (IMD) आगामी काही दिवसांतही ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दशकातील मे महिन्यातील मासिक पावसाची नोंद (मि.मी.)
वर्ष | मासिक पावसाची नोंद (मि.मी.) |
२०१५ | ६२.५ |
२०१६ | ००.० |
२०१७ | ००.० |
२०१८ | ०१.१ |
२०१९ | ०२.४ |
२०२० | ०१.६ |
२०२१ | ०२.७ |
२०२२ | ००.० |
२०२३ | ५८.१ |
२०२४ | ००.८ |
२०२५ | ९५.६ (आतापर्यंत विक्रमी) |