सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पाणीसाठा ७० टीएमसीजवळ पोहोचला आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार दिवसांतच धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करावा लागणार आहे.
परिणामी, कोयना नदीची पाणी पातळीही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही आढावा घेऊन सांगली व कोल्हापूरच्या कृष्णाकाठाची पूरस्थिती टाळण्यासाठी विसर्गाचे नियोजन करावे, अशी सूचना प्रशासनाला सोमवारी दिली.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणातील साठाही वेगाने वाढू लागला आहे.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास धरणात ६९.०४ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यातच सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू असून, त्यातून २ हजार १०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
कोयना धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीजवळ पोहोचल्याने मंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे धरणातील पाणी पातळी, पाऊस यांचा सोमवारी आढावा घेतला.
कोयना धरणात ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. पाणी विसर्गामुळे पूरस्थिती होऊ नये यासाठी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करा.
पाणी सोडताना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा द्या. तलाठी, मंडळाधिकारी, पोलिस पाटील यांच्या बैठका घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री देसाई यांनी केल्या.
७३ टीएमसी साठ्याला दरवाजाला पाणी- कोयनानगर येथे आतापर्यंत २ हजार ४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.- धरणातील साठा ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर आहे.- गेल्या काही दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात दररोज २ ते ३ टीएमसीने वाढ होत आहे.- पाऊस असाच राहिल्यास गुरुवारपर्यंत धरणाच्या दरवाजातून विसर्गाची शक्यता आहे.- धरणात ७३ टीएमसी पाणीसाठा झाल्यास दरवाजाला पाणी लागते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?