कोयना पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. धरणातून २० हजार ९०० क्युसेकने विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. शनिवारी रात्री सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी १५.३ फूट इतकी होती.
सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव, शिराळा, वाळवा याठिकाणी दिवसभर पावसाची हजेरी होती. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वारणा धरणातूनही विसर्ग सुरू आहे.
कोयना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोयनेतून शनिवारी विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. कोयना धरणात सध्या ८३.०५, चांदोली धरणात २८.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. शनिवारच्या आठवडा बाजारात नागरिकांचे हाल झाले.
कोयना धरणात २४ तासांत ३.६७टीएमसी पाणी
२४ तासांत धरणात ३.६७टीएमसी पाणी आले आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ वाजता सहा वक्र दरवाजे चार फूट उघडून १६,५६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला, पण दिवसभर आवक वाढत राहिल्याने सायंकाळी दरवाजे पाच फूट उचलून विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.
रत्नागिरीत जोर वाढला
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर जोराच्च्या वाऱ्यासह पावसाच्या सरी पडत होत्या. शनिवारीही दिवसभरात ठराविक पण जोरदार सरी पडत होत्या.
सिंधुदुर्गात पावसाच्या जोरदार सरी
कणकवली शहरासह जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
हेही वाचा : फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा मिळालेला सर्पमित्र नक्की कसा असावा? वाचा सविस्तर