सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत असून २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ४ तर नवजा येथे ६ मिलीमीटरची नोंद झाली. यामुळे पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे पूर्णत: बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. पायथा वीजगृहातूनच सध्या विसर्ग सुरू आहे. तर धरणात १०४ टीएमसीवर पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात अतिवृष्टी झाली होती. पाच तालुक्यांना याचा फटका बसला. यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, ऑक्टोबर महिना उजाडताच पाऊस थांबला आहे. पूर्व भागात पावसाची पूर्ण उघडीप आहे. तर पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोन्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे.
पण, यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झालेली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची उघडझाप सुरू आहे. परिणामी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास तर धरणात सुमारे ६ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्याचवेळी धरणात १०४.०६ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
त्यामुळे धरण पूर्ण भरण्यासाठी दरवाजे पूर्ण बंद करण्यात आले ओत. परिणामी दरवाजातून होणार विसर्ग पूर्ण बंद झाला आहे. सध्या पायथा वीजगृहाची दोन युनीट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे.
सातारा शहरासह परिसरात चार दिवसांपासून पावसाची पूर्णपणे उघडीप आहे. दिवसभर सूर्यदर्शन होत आहे. त्याचबरोबर धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी या धरण क्षेत्रातही पावसाची उघडीप आहे. पण, ही सर्व धरणे पूर्ण भरलेली आहेत. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आलेला आहे.