Join us

Kalammawadi Dam : अखेर काळम्मावाडी धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:07 IST

काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्यास पनोरीजवळ मोठी घळ पडल्याने दूधगंगा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गेले पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद होता.

काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्यास पनोरीजवळ मोठी घळ पडल्याने दूधगंगा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गेले पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद होता.

मात्र, हा पडलेला घळ बुजवण्याचे काम गेले १५ दिवस युद्ध पातळीवर सुरू होते ते पूर्ण झाले. त्यामुळे शनिवारी उजव्या कालव्यातून पाणी सोडले व आज, रविवारी (दि. २२ डिसेंबर) डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो एकर उभ्या ऊस पिकांना दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांना वरदायिनी ठरलेल्या या काळम्मावाडी प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या डाव्या कालव्याला पनोरी गावाजवळ घळ पडले. घळ पडलेल्या काही अंतरावरच उजव्या कालव्याला पाणी सोडणारे गेट आहे. त्यामुळे डाव्या व उजव्या या दोन्ही कालव्यांना पाणीपुरवठा बंद होता.

पाणी बंद झाले आणि घळ बुजवण्याच्या कामाला किती कालावधी लागेल अशा चिंतेत शेतकरी वर्ग होता, तर शेकडो एकर क्षेत्रात उभी असणारी ऊस पिके या पाण्यावर अवलंबून असल्याने काम युद्धपातळीवर सुरू होते. ते काम पूर्ण झाले.

उजव्या कालव्यातून काळम्मावाडी-सरवडे ते बिद्रीपासून पुढे, तर मुदाळतिट्टा ते टिक्केवाडी आणि बाळूमामा मंदिरजवळील ओढ्यातून वेदगंगा नदीद्वारे पुढे कर्नाटकात असा पाणीपुरवठा होतो, तर डाव्या कालव्यातून पनोरी-आकनूर-तळाशी ते म्हाळुंगेपासून पुढे पाणीपुरवठा सुरू असतो. १५ दिवसाआड हा पाणीपुरवठा असतो.

ऊस लावणीस वेगमात्र, कालव्यास पडलेल्या घळीमुळे गेले १५ दिवस उभी ऊस पिके सुकली होती. आता तर नवीन ऊस लावणी खोळंबल्या होत्या. आता घळ बुजविण्याचे काम पूर्ण झाल्याने आज उजव्या कालव्यातून ४०० क्युसेस पाणी सोडले आहे, तर उद्या रविवार दि. २२ रोजी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ऊस पिकांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :धरणपाणीपीकऊसकोल्हापूरसांगलीमहाराष्ट्रकर्नाटकपाटबंधारे प्रकल्प