कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यात शुक्रवारी दिवस-रात्र पावसाचा जोर वाढला होता. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कडवी आणि शाळी नदीच्यापाणीपातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाणीनदीपात्राच्या बाहेर आले आहे.
मलकापूर येथील मलकापूर-येळाणे मार्गावरील बंधाऱ्यावर पाणी आले. तर भीमाशंकर मंदिरात देखील पाणी गेले आहे. कडवी धरण शंभर टक्के भरून वाहू लागले आहे. कडवी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेली काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, शुक्रवारपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. कडवी, वारणा, कासारी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून भात व ऊस शेती पाण्याखाली गेली आहे.
धरणक्षेत्रासह पावसाचे प्रमाण वाढल्याने कडवी आणि शाळे नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. कडवी, पालेश्वर, गेळवडे या धरणांतील पाणीसाठा देखील वाढू लागला आहे.
पुराच्या पाण्यामुळे कडवी नदीवरील वालूर, भोसलेवाडी, निळे, पेरीड, शिरगाव, सोते, पाटणे, येळाणे, टेकोली हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. येथील वाहतूक बंद झाली आहे.
चांदोली धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने वारणा नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था देखील प्रशासनाच्या वतीने तयार ठेवण्यात आली आहे.
वीज नसल्याचा फटका
रस्त्यांवर पाणी आल्याने दूध वाहतूक बंद झाली आहे. त्याचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच बर्की, कांटे, बुरंबाळ, गिरगाव, अनुस्कुरा या गावात दोन दिवसांपासून वीज नसल्यामुळे लोकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर