बाबासाहेब धुमाळ
बहुचर्चित रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या (Ramakrishna Godavari Lift Irrigation Scheme) ६३ कोटी ६७ लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम शासनाने सहकार आयुक्तांमार्फत जिल्हा बँकेला धनादेशाद्वारे नुकतीच प्रदान केल्याने तालुक्यातील १४ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमुक्ती मिळाली आहे. (Ramakrishna Godavari Lift Irrigation Scheme)
जिल्हा बँकेने यापूर्वीच यासंदर्भातील १४५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या पुढाकारातून वैजापूर तालुक्यातील महालगाव, भगूर, पानवी, टेंभी, सिरसगाव, बल्लाळीसागज, एकोडीसागज, खिर्डी, माळीसागज, कनकसागज, टाकळीसागज, गोळवाडी, पालखेड, दहेगाव या १४ गावांच्या पिण्याच्या पाण्यासह २ हजार ११७ शेतकरी सभासदांच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी ''श्री रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना'' कार्यान्वित करण्यात आली.
१९९१-९२ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून लाभधारक शेतकऱ्यांच्या सातबारावर ३४ कोटी रुपये कर्ज घेऊन ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा करण्याचे ठरले होते. योजना कार्यान्वित होऊन ७ ते ८ वर्षे चालू राहिली.
सन १९९५ मध्ये पैठण येथील जायकवाडी धरणासाठीपाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. याचबरोबर ढिसाळ नियोजन व भ्रष्टाचाराच्या वाळवीने अखेर ही योजना बंद पडली. त्यामुळे या योजनेसाठी घेतलेल्या कर्जापोटी २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या डोक्यावर २१० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर होता.
दरम्यान, १८ जून २०२४ रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी राहुल शिंदे यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशानुसार, या योजनेचे थकीत कर्ज (मुद्दल) रुपये ६४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला; परंतु उर्वरित रक्कम भरल्याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नव्हती. २१० कोटींचे जवळपास कर्ज असलेल्या रकमेबाबत वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू होती.
२१७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा
* नागपूर येथे डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जपोटी असलेला उर्वरित निधी म्हणजेच ६३ कोटी ६७ लाख रुपये वितरित करण्याची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली.
* त्यानुसार सहकार आयुक्तांनी या रकमेचा धनादेश जिल्हा 3 मध्यवर्ती बँकेला नुकताच सुपूर्द केला आहे.
* या निर्णयामुळे तालुक्यातील २ हजार ११७ शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांचा सातबारा खऱ्या अर्थाने कोरा होणार आहे.
२१० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या डोक्यावर होता. शासनाच्या निर्णयामुळे या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. त्यांच्या सातबारावरील यासंदर्भातील कर्जाचा बोजा कमी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा बँकेच्या १६ जुलै २०२४ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत बँकेने योजनेची १४५ कोटी २७लाख १० हजार रुपये कर्जमाफीचा निर्णय घेतला.
आमदार रमेश बोरनारे यांनी या सभेत कर्जमाफीचा ठराव मांडला. संचालक डॉ. दिनेश परदेशी यांनी अनुमोदन दिले आणि सर्व सभासदांनी ठरावास संमती दिली होती.