Join us

मागील वर्षीच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील भाटघर अन् नीरा देवघर धरणांत किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:03 IST

तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाटघर अन् नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

नातेपुते : भाटघर धरणात ४८.२३ टक्के, तर निरा देवघर धरणात ३५.७२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरणातून २,१२२ क्युसेक आणि निरा देवघर धरणातून ७५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निरा देवघर व भाटघर ही दोन्ही धरणे पूर्ण भरली होती. ४ फेब्रुवारीला भाटघर ७७.१२ टक्के तर निरा देवघरमध्ये ६८.२८ टक्के पाणीसाठा होता.

गतवर्षी २८ मार्चला भाटघरमध्ये ३५.१२ टक्के व निरा देवघरमध्ये ३४.७० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाटघरमध्ये १३ टक्के तर निरा देवघर धरणात १ टक्के जादा पाणीसाठा आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली होती.

नीरा खोऱ्यातील धरणांमुळे दिलासा१) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या निरा खोऱ्यातील चारही धरणांत ऐन उन्हाळ्यात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतीसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.२) तालुक्याच्या बागायती पट्ट्याला वरदान ठरलेल्या निरा उजव्या कालव्यातून सध्या शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. यामुळे नदीकाठ आणि निरा उजव्या कालव्याशेजारील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. माळशिरस तालुक्यातील दक्षिणेकडील सुळेवाडी, बचेरी, मगरवाडी या गावांत पाणीटंचाई भासत असल्याने ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा विभागाकडे टँकर मागणीचे प्रस्ताव आल्याने चार गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. - सुरेश शेजूळ, तहसीलदार, माळशिरस

अधिक वाचा: 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' योजनेतंर्गत गाळ काढण्यासाठी १०५ कोटी रुपये आले; वाचा शासन निर्णय

टॅग्स :धरणपाणीशेतकरीशेतीपीकतहसीलदारदुष्काळपाणी टंचाई