रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील हेटवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठावरील गावातील नागरिक, तसेच पेण शहरातील नदी किनारी असलेल्या म्हाडा वसाहत उत्कर्षनगर गोविंद बाग या परिसरातील नागरिकांना महसूल, नगर परिषद प्रशासनाने सतर्कतेचा शुक्रवारी इशारा दिला होता.
गेले चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे हेटवणे धरणाच्यापाणी पातळीत चार दिवसांत ११ मीटर वाढ होऊन ऐनवेळी हेटवणे मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचा संदेश आपत्कालीन यंत्रणेला दिला
हेटवणे धरण भरल्यानंतर नवी मुंबई पनवेल, उरण या सिडकोच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या दूर झाली आहे. अजून दोन महिने पावसाचा कालावधी असून बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
भोगावती नदी तटावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पावसाच्या सरी शनिवारी सकाळपासून अधूनमधून कोसळत आहेत. सायंकाळी पावसाने जर सुरुवात केली तर धरणातील पाणी सोडण्याची शक्यता आहे.
११ मीटर पाण्याची धरणात वाढ झाली आहे.
सुरक्षेचे कारण धरणाचे दरवाजे उघडणे आवश्यक ठरते. यावेळेस धरणाच्या सांडव्यातून प्रति सेकंद ९.४४ घनमीटर एवढ्या पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत राहील. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विसर्ग होत असल्याने भोगावती नदी तटावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा : फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा मिळालेला सर्पमित्र नक्की कसा असावा? वाचा सविस्तर