लातूर जिल्ह्यात शनिवारी (दि. १३) रात्री मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील सात महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शिल्लक राहिलेली शेतीपिके मातीमोल झाली आहेत.
दरम्यान, औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा व मांजरा या दोन्ही नद्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे दोन्ही नद्यांवरील औराद-वांजरखेडा, हालसी-तुगाव पूल पाण्याखाली गेल्याने नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला.
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सतत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील लातूर, कन्हेरी, किनी, उदगीर, नागलगाव, मोघा, तोंडार या सात महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
रविवारी सकाळी ८ वाजताच्या मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २५.७ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६१९.३ मिमी पाऊस पडला आहे.
पावसामुळे मांजरा व निम्न तेरणा प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. औराद शहाजानी परिसरात मांजरा व तेरणा या दोन्ही नद्यांच्या संगमावर मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे. बॅकवॉटर तीन ते चार किलोमीटरपर्यंत गेले आहे.
गावांचा संपर्क तुटला
पुराच्या पाण्यामुळे नदीपलीकडील तुगाव, आळवाई, मेहकर, कोगळी, श्रीमाळी, वांजरखेडा आदी गावांचा औराद शहाजानी बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. औराद शहाजानी परिसरात मे महिन्यात २५० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर आतापर्यंत ६५० मिमी पाऊस झाला. सरासरीपेक्षा १५० मिमी अधिक पाऊस झाला असल्याचे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.