नीरा खोऱ्यातील वीर धरण आणि भाटघर, नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा वाढला आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता वीर धरणातून ३३ हजार ५५२ क्युसेक इतका सुरु करण्यात आला आहे.
पाणीसाठा वेगाने वाढू लागल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धरणांच्या सांडव्यांचे दरवाजे उघडण्यात आले असून, नीरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
वीर धरणातून ३३ हजार ५५२ क्युसेक आणि भाटघर धरणातून १००१४ क्युसेक तर नीरा देवघरमधून ६८८० क्युसेकने वेगाने पाणी सोडले जात आहे.
पाण्याचा सतत वाढता विसर्ग लक्षात घेता, नीरा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नीरा खोऱ्यातील पाणीसाठावीर धरण ९३.९० टक्केभाटघर धरण १०० टक्केनीरा देवघर ९८.२८ टक्केगुंजवणी ७८ टक्के
स्थानिक नागरिकांनी नदीच्या पात्रात कुठेही जाऊ नये, जनावरे नदीकाठी नेऊ नयेत तसेच पुराच्या संभाव्य धोक्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दर तासागणिक परिस्थितीत बदल झाल्यास किंवा पावसाचा जोर वाढल्यास आणखी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
अधिक वाचा: शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार; लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू