वारी भैरवगड परिसरातील हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रत्येकी ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या धरणात ८३.६५ टक्के इतका जलसाठा असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे.
परिणामी धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वान नदी पात्रात ७३.८६ घनमीटर प्रति सेकंद या वेगाने विसर्ग सुरू केला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गत काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जलाशयातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. सुरुवातीस पावसाने दडी मारल्यामुळे धरण भरते की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने धरणातून अधिक पाणी सोडावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नदीकिनाऱ्यावरील गावांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
याशिवाय आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून संभाव्य परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन जलसंपदा विभाग आणि महसूल यंत्रणा समन्वयाने काम करत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.