बाबासाहेब धुमाळ
वैजापूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतीला पाणी मिळावे, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून 'नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प' उभारला खरा.
परंतु, तब्बल २० वर्षांनंतरही ४३ हजार ८६० हेक्टर क्षेत्र सिंचनाचे जे उद्दिष्ट होते, ते अजूनही या कालव्यातील पाण्याने पूर्ण झालेले नाही. या प्रकल्पाचे अजूनही १० टक्के काम अपूर्ण असल्याने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना या कालव्यातील पाण्याचा फायदा होत नाही. त्यामुळे हे काम पूर्ण करणे गरजचे आहे.
दिवंगत विनायकराव पाटील यांच्या संकल्पनेतील 'नांदुर मधमेश्वर' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो दुष्काळी तालुके म्हणून ओळख असलेल्या गंगापूर व वैजापूरसाठी संजीवनी आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीस १९ जुलै १९७९ रोजी मंजुरी मिळाली होती. यासाठी ४८.७० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पाच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील मुकणे, भावली, वाकी आणि भाम हे चार प्रकल्प उभारून त्यातील पाणी गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यामध्ये आणण्यात आले.
तसेच, तेथून नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे हे पाणी वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेती सिंचनाखाली आणण्याचे नियोजन होते. नांदूर मधमेश्वर प्रकल्प ते गंगापूर हा मुख्य कालवा १२७.६० किमी असून, त्याचे संपूर्ण अस्तरीकरण करण्यात आले आहे.
तसेच, मुख्य कालव्यावर ३१ वितरिका असून, त्या वितरिकेवर उपवितरिका आहेत. या कालव्याच्या पाण्यातून अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील १ हजार ५६२ हेक्टर, वैजापूर तालुक्यातील २५ हजार ८९४ हेक्टर आणि गंगापूर तालुक्यातील १६ हजार ४०४ हेक्टर, असे एकूण ४३ हजार ८६० हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट्य आहे.
परंतु, अद्यापपर्यंत सिंचनाचे ५० टक्के देखील उद्दीष्टे पूर्ण झालेले नाही, २००४-२००५ पासून या कालव्यातून पाणी येण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या वर्षी फक्त २ हजार ४०८ हेक्टरचे क्षेत्रात सिंचन झाले. सर्वाधिक सिंचन हे २०१६-२०१७ या वर्षात २ हजार ८७२ हेक्टर इतके झाल्याचे दाखवण्यात आले.
१९७९ साली कालव्याच्या कामास सुरुवात झाली. त्यानंतर पाच वर्षे काम चालल्यानंतर प्रकल्पाचे काम रखडले. त्यानंतरही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
प्रकल्पाचा प्रवास
■ सिंचनाची सुरुवात २००४-२००५
■ पहिल्या वर्षी सिंचित क्षेत्र २,४०८ हेक्टर
■ सर्वाधिक सिंचन (२०१६-२०१७)
प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यता १९ जुलै १९७९ | ४८.७० कोटी रुपये |
प्रथम सुधारित मान्यता ९ जुलै १९९९ | ५७८.३७ कोटी रुपये |
दुसरी सुधारित मान्यता १६ नोव्हेंबर २००५ | ८६६.३० कोटी रुपये |
तिसरी सुधारित मान्यता १३ ऑक्टोबर २०१६ | २२१०.५९ कोटी रुपये |
मुख्य कालव्याची लांबी | १२७.६० किमी |
सिंचनाचे उद्दिष्ट क्षेत्र हेक्टर मध्ये
कोपरगाव तालुका | १,५६२ |
वैजापूर तालुका | २५,८९४ |
गंगापूर तालुका | १६,४०४ |
एकूण | ४३,८६० |