मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि नाशिक जिल्हयांतील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी गोदावरीला महारौद्ररुप धारण केले आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे. गोदावरीच्या महापुरामुळे पैठण शहरात तब्बल १९ वर्षानंतर पाणी घुसले आहे. जायकवाडी धरणांतून रात्री ११ वाजेच्या सुमारास तीन लाख सहा हजार क्युसेक इतका पाण्याचा प्रचंड विसर्ग करण्यात येत आहे.
धरण बांधल्यानंतर पहिल्यांदाच इतका विसर्ग झाला असून ही ऐतिहासिक घटना आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसाने मराठवाड्यात विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे पुन्हा अनेक गावांचा संपर्क तुटला असून वस्त्या शिवारं जलमय झाली आहेत. शिवाय मराठवाड्यातील सर्व मोठ्या धरणांतून विसर्ग सुरु आहे.
मराठवाड्यात शनिवारी रात्रीतून विभागात १८९ मंडळांतर्गत येणाऱ्या ३८०० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर मध्ये तूफान पाऊस झाला. सप्टेंबरमधील २८ दिवसांत विभागात ३६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी दिवस व रात्रीतून २८ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत विभागात एकूण ५५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.
यात सर्वाधिक पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११० मिमी कोसळला. या पाठोपाठ जालना ६२, बीड ६३, लातूर २५, धाराशिव ३९, नांदेड २६, परभणी ४४ तर हिंगोली जिल्ह्यात ५५ मिमी पाऊस रविवारी सकाळपर्यंत झाला. परभणी जिल्हयावर सलग तीन दिवसांपासून आभाळ कोसळत आहे.
कधी कधी केला १ लाखापेक्षा जास्त विसर्ग ?
१९७६ - १ लाख ५० हजार
१९८० - १ लाख ३० हजार
१९९४ - १ लाख १६ हजार
२००६ - २ लाख ५० हजार
२००८ - १ लाख ५४ हजार
२०२२ - १ लाख १३ हजार
२०२५ - ३ लाख ६ हजार