कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. गगनबावडा, शाहुवाडी तालुक्यात काही प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू आहे. धरणक्षेत्रातहीपाऊस कमी झाल्याने विसर्ग तुलनेत कमी आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १,५०० तर दूधगंगा धरणातून ४,६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर ओसरल्याने पुराचे पाणीही हळूहळू कमी होत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी सकाळपासून त्याही कमी झाल्या आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण असले, तरी पाऊस कमी झाला आहे. शनिवारी सकाळ आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात १२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही सरासरी १५ मिलीमीटर पाऊस झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे सर्वच स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून, सांडव्यातून प्रतिसेकंद १,५०० तर वारणा धरणातून ३,२२५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुराचे पाणी हळूहळू कमी होत आहे.
पंचगंगा नदीची पातळी २० फुटांपर्यंत खाली आली असून, अद्याप २६ बंधारे पाण्याखाली आहेत. दिवसभरात दोन फुटांनी पाण्याची पातळी कमी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात चार खासगी मालमत्तांची पडझड होऊन ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अल्लमट्टीतून ८७ हजारांचा विसर्ग
अलमट्टी धरणात प्रतिसेकंद १ लाख २९ हजार घनफूट पाणी येत आहे. त्यातून ८७ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.